Hot Posts

6/recent/ticker-posts

जयकुमार गोरेंना फुटबॉल तर शंभूराजेंना कपाट, चिन्हं ठरलीआता प्रचाराला येणार वेग!


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

सातारा: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील १२ जागांसाठी रिंगणात असलेल्या २८ उमेदवारांना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी संजय सुद्रिक यांनी निवडणूक चिन्हांचे वाटप केले. चिन्हवाटपानंतर अंतिम उमेदवार यादीसह चिन्हे जिल्हा बँकेच्या प्रसिद्धी फलकावर प्रदर्शित करण्यात आली. त्यामुळे निवडणुकीतील प्रचाराला आता वेग येणार असून, मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची धावपळ वाढणार आहे.

प्राथमिक कृषी पतपुरवठा विकास सेवा सोसायटीच्या मतदारसंघांत जावळीतील विठ्ठल गोळे यांना छताचा पंखा, ज्ञानदेव रांजणे यांना ट्रॅक्टर, महाबळेश्वरमधील संजय मोरे यांना प्रेशर कुकर, तर रूपाली राजपुरे यांना टेबल चिन्ह मिळाले. कराडमधील उदयसिंह पाटील यांना हिरा, धनंजय पाटील यांना अंगठी, पाटणमधील शंभूराज देसाई यांना कपाट, तर सत्यजित पाटणकर यांना ऑटोरिक्षा देण्यात आली. कोरेगावमध्ये सुनील खत्री यांना कपबशी, तर सुनील माने यांना स्कूटर चिन्ह मिळाले.

माण मतदारसंघात ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांना फुटबॉल, शेखर गोरे यांना कॅरम बोर्ड, तर मनोज पोळ यांना चष्मा चिन्ह देण्यात आले. खंडाळ्यात अजय भोसले यांना खटारा, शामराव गाढवे यांना चालण्याची काठी, तर संजीव गाढवे यांना मोबाईल चिन्ह मिळाले. फलटणमध्ये समशेर नाईक निंबाळकर यांना हेलिकॉप्टर, तर संजीवराजे नाईक निंबाळकर यांना सुटकेस चिन्ह देण्यात आले.

अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गात सत्यवान कांबळे यांना बस, सुरेश गायकवाड यांना टॅक्सी, दीपक चव्हाण यांना छत्री, तर रवींद्र बडेकर यांना लिफाफा चिन्ह मिळाले. इतर मागास प्रवर्गात संदीप पाचांगणे यांना बॅट, तर योगेश फडतरे यांना छत्री देण्यात आली. विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गात अर्जुन काळे यांना बशी, तर सुनील वाघ यांना किटली चिन्ह मिळाले.

चिन्हवाटपामुळे उमेदवारांना प्रचाराची दिशा स्पष्ट झाली आहे. आगामी दिवसांत चिन्हांची ओळख मतदारांपर्यंत पोहोचवणे, स्थानिक समीकरणे जुळवणे आणि मतदारांचा पाठिंबा मिळवणे, यासाठी चुरस वाढण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments