सत्य सह्याद्री/सातारा
सातारा येथील यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये १९ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तरुणीने गळफास घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, मृत तरुणीच्या पालकांनी तिच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करत सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. घटनेची सखोल चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलिसांनी तपास सुरू केला. तरुणीने टोकाचे पाऊल कोणत्या कारणातून उचलले, तसेच या घटनेमागे अन्य काही कारण आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. घटनास्थळावरील परिस्थिती, उपलब्ध पुरावे आणि संबंधित व्यक्तींची माहिती तपासण्यात येत असून, मृत्यूचे नेमके कारण तपासाअंती स्पष्ट होणार आहे. पालकांनी व्यक्त केलेल्या संशयाचाही तपासाचा भाग म्हणून विचार केला जात आहे.
दरम्यान, तीन महिन्यांपूर्वीच येथील वायसी कॉलेजच्या होस्टेलमधून उडी मारून युवतीने आत्महत्या केली होती. ही घटना स्मरणातून गेली नसतानाच पुन्हा अशाच प्रकारची घटना यशोदा कॅम्पसमध्ये घडल्याने सातारा शहरासह जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात याबाबतची चर्चा सुरु झाली आहे.
0 Comments