सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा : सदर बाजारमधून जाणाऱ्या जिल्हा परिषद ते सैनिक नगर दरम्यानच्या १८ फूट रुंदीच्या रस्त्याच्या प्रस्तावित रुंदीकरणाला स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवला आहे. या रुंदीकरणामुळे नागरिकांच्या घरांचे, कंपाउंड वॉलचे तसेच शेकडो वर्षे जुन्या झाडांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याचे सांगत नागरिकांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे निवेदनाद्वारे आपली भूमिका मांडली.
नगरसेवक निशांत पाटील आणि नगरसेविका भारती सोलंकी यांच्या नेतृत्वाखाली सदर बाजारातील नागरिकांनी मुख्याधिकारी, नगराध्यक्ष अमोल मोहिते तसेच बांधकाममंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना निवेदन दिले. प्रस्तावित रुंदीकरणाचा पुनर्विचार करून स्थानिक रहिवाशांच्या अडचणींचा विचार करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या संदर्भात निशांत पाटील म्हणाले की, रस्ता रुंदीकरणाबाबत नागरिकांना नोटिसा मिळाल्या आहेत. या प्रक्रियेत अनेकांच्या कंपाउंड वॉल, शेड तसेच जुन्या झाडांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. संबंधित रस्ता हा प्रामुख्याने निवासी परिसरातील असून येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक नसल्याचे त्यांनी नमूद केले.
वर्दळ कमी असलेल्या या रस्त्यावर दोन्ही बाजूंच्या नागरिकांच्या घरांचे नुकसान होईल अशा पद्धतीने रुंदीकरण करण्याऐवजी कंपाउंड वॉल ते कंपाउंड वॉल सिमेंटचा रस्ता तयार करण्याचा पर्याय विचारात घ्यावा. तसेच स्थानिक नागरिकांच्या भावना आणि अडचणी लक्षात घेऊन निर्णय घ्यावा, अशी भूमिका पाटील यांनी मांडली. प्रस्तावित रस्ता रुंदीकरणामुळे निवासी परिसरातील नागरिकांच्या मालमत्तांवर आणि जुन्या वृक्षांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने या प्रकरणी प्रशासन काय निर्णय घेणार, याकडे सदर बाजारातील रहिवाशांचे लक्ष लागले आहे.

0 Comments