सातारा, ता. ३ : प्रतिनिधी
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षांमध्येच रंगलेल्या सत्तास्पर्धेत भाजपने निर्विवादपणे ‘मोठ्या भावाची’ भूमिका मिळवली आहे. आज झालेल्या मतमोजणीत १२ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने पाच, भाजपने चार, तर शिवसेनेने तीन जागा जिंकल्या. यापूर्वी बिनविरोध झालेल्या नऊ जागांमध्ये भाजपचे पाच, राष्ट्रवादीचे तीन आणि शिवसेनेचा एक संचालक निवडून आला होता. त्यामुळे बँकेच्या २१ सदस्यीय संचालक मंडळात भाजपचे नऊ, राष्ट्रवादीचे आठ आणि शिवसेनेचे चार असे पक्षीय बलाबल स्पष्ट झाले आहे. भाजपने संख्याबळात आघाडी घेतली असली तरी राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे एकत्रित संख्याबळही १२ असल्याने अध्यक्षपदाच्या निवडीत महायुतीतील राजकीय समीकरणे निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे बँकेच्या अध्यक्षपदासाठी आता महायुतीत जोरदार रस्सीखेच होण्याची चिन्हे आहेत.
मतमोजणीला सकाळी आठ वाजता जिल्हा बँक्स असोसिएशनच्या सभागृहात सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. पाटणमधून मंत्री शंभूराज देसाई यांनी विजयाची सलामी दिली. त्यानंतर कोरेगावमध्ये राष्ट्रवादीचे सुनील माने आणि भाजपचे सुनील खत्री यांच्यात अटीतटीची लढत झाली. सुरुवातीला ४५ मते मिळाल्याने माने यांच्या विजयाची घोषणा झाली; मात्र एका फाटलेल्या मतपत्रिकेवर आक्षेप घेतल्यानंतर ते मत बाद करण्यात आले. त्यामुळे दोघांनाही ४४-४४ मते मिळाली. अखेर ईश्वरी चिठ्ठी काढण्यात आली आणि त्यात सुनील माने यांच्या बाजूने कौल लागला. या निकालाने मतमोजणी केंद्रावर मोठा जल्लोष झाला.
माणमध्ये ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी ५३ मते मिळवत विजय मिळवला. त्यांचे बंधू शेखर गोरे यांना सात, तर राष्ट्रवादीचे मनोज पोळ यांना १४ मते मिळाली. खंडाळ्यात राष्ट्रवादीचे अजय भोसले यांनी २८ मते मिळवून विजय मिळवला. संजीव गाढवे यांना २१, तर श्यामराव गाढवे यांना एकही मत मिळाले नाही. जावळीत ज्ञानदेव रांजणे यांनी ३८ मते मिळवून विजय मिळवला. विठ्ठल गोळे यांना आठ मते मिळाली.
महाबळेश्वरमध्ये राष्ट्रवादीच्या रुपाली राजपुरे यांनी आठ मते मिळवून विजय मिळवला. शिवसेनेचे संजय मोरे यांना चार मते मिळाली. फलटणमध्ये संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी ७१ मते मिळवत बाजी मारली. समशेर नाईक निंबाळकर यांना ६० मते मिळाली. कराडमध्ये उदयसिंह पाटील यांनी १०० मते मिळवून विजय मिळवला, तर धनंजय पाटील यांना ४४ मते मिळाली.
राखीव मतदारसंघांमध्येही चुरशीची लढत पाहायला मिळाली. अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून दीपक चव्हाण यांनी १,८४२ मते मिळवून विजय मिळवला. रवींद्र बडेकर यांना १६, सुरेश गायकवाड यांना २१, तर सत्यवान कांबळे यांना ९१ मते मिळाली. इतर मागास प्रवर्गातून राष्ट्रवादीचे योगेश फडतरे यांनी १,८८३ मते मिळवून विजय मिळवला. संदीप पाचांगणे यांना ७५ मते मिळाली. औद्योगिक, विणकर व मजूर संस्था मतदारसंघातून शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक चंद्रकांत जाधव यांनी २९४ मते मिळवून विजय मिळवला. सुनील वाघ यांना २४ मते मिळाली.
या निकालाने जिल्हा बँकेतील सत्तेचे गणित स्पष्ट झाले असले तरी सत्तेचा मुकुट कोणाच्या डोक्यावर चढणार, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. भाजपकडे सर्वाधिक नऊ जागा असल्याने अध्यक्षपदावर दावा करण्याची ताकद आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आल्यास त्यांचे संख्याबळ भाजपइतकेच होते. त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक ही केवळ पदाची लढाई न राहता महायुतीतील वर्चस्वाची खरी परीक्षा ठरणार आहे. निवडणुकीत एकत्र लढलेले नेते आता अध्यक्षपदासाठी एकमेकांसमोर उभे ठाकणार का, याकडे जिल्ह्याच्या सहकार आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

0 Comments