शासनाची पूर्वमान्यता प्राप्त, पार्किंग व निरूपण बैठक हॉलच्या उभारणीचा मार्ग मोकळा....
मा.ना.मकरंद आबा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश....
महाबळेश्वर :- महाबळेश्वर शहराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पार्सनेज मार्केट (सि. स. नं. १६९) येथील शासकीय भाडेपट्टा (लीज) नूतनीकरणाचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाकडून या भाडेपट्टा नूतनीकरणास अधिकृत पूर्वमान्यता मिळाल्याने शहरातील व्यापारी बांधवांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, या निर्णयामुळे महाबळेश्वरच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
पार्सनेज मार्केटचा प्रश्न हा केवळ व्यापारी बांधवांच्या दृष्टीने नव्हे, तर महाबळेश्वर शहराच्या नियोजनबद्ध विकासाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा मानला जात होता. या जागेच्या भाडेपट्टा नूतनीकरणाचा प्रश्न शासन दरबारी सातत्याने मांडून त्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. अखेर या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद मिळत शासनाकडून पूर्वमान्यता प्राप्त झाल्याने शहराच्या विकासातील एक महत्त्वाचा अडथळा दूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या निर्णयामुळे महाबळेश्वर येथे महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी निरूपण बैठक हॉल उभारण्यासह पर्यटकांसाठी भव्य पार्किंग सुविधा निर्माण करण्याच्या प्रस्तावाला गती मिळण्याची अपेक्षा आहे. पर्यटननगरी महाबळेश्वरमध्ये वाढत्या पर्यटकांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर पार्किंगची सुविधा हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय बनला असून, या जागेचा नियोजनबद्ध वापर झाल्यास शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यास आणि पर्यटकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यास मोठी मदत होऊ शकते.
या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे, महसूल मंत्री ना. चंद्रशेखरजी बावनकुळे तसेच मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद (आबा) पाटील यांनी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केल्याबद्दल महाबळेश्वरकरांच्या वतीने त्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
त्याचबरोबर या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करणारे महाबळेश्वर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष श्री. सुनील (दादा) शिंदे, स्वच्छता सभापती व नगरसेवक ॲड. संजय जंगम तसेच सर्व सहकारी नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्या प्रयत्नांचेही विशेष कौतुक होत आहे. शहराच्या हितासाठी सातत्याने प्रयत्नशील राहून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी केलेल्या या सामूहिक प्रयत्नांना मिळालेले यश महाबळेश्वरच्या विकासाच्या दृष्टीने निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
पार्सनेज मार्केटच्या भाडेपट्टा नूतनीकरणास मिळालेली पूर्वमान्यता ही महाबळेश्वरच्या विकासाच्या वाटचालीतील एक सकारात्मक आणि महत्त्वाची घटना मानली जात असून, आगामी काळात या जागेचा योग्य नियोजनातून उपयोग करून शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये भर घालण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. या यशाबद्दल सर्व संबंधित लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचे महाबळेश्वरकर नागरिक व व्यापारी बांधवांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून, शहराच्या विकासासाठी त्यांच्या भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
0 Comments