Hot Posts

6/recent/ticker-posts

माहुली, वसना पुलावरून अधिकाऱ्यांना बांधकाम मंत्र्यांच्या कानपिचक्या, सातारा- लोणंद काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

सातारा- सातारा ते लोणंद रस्त्याचे काम सुरु असून काही ठिकाणी हे काम रखडले आहे. तसेच शिरवळ ते लोणंद या रस्त्याचेही काम काही ठिकाणी रखडले आहे. या दोन्ही रस्त्यांचे काम तातडीने पूर्ण करा. सातारा ते कोल्हापूर महामार्गावर सेवा रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करा अशा सक्त सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. दरम्यान, सातारा- कोरेगाव रस्त्यावर माहुली येथील आणि वसना नदीवरील पुलाचे काम अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्याचे नमूद करून ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. 

जिल्हाधिकारी कार्यालय येथे ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्ह्यातील विविध रस्ते, महामार्ग यासंदर्भात आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीला आ. डॉ. अतुल भोसले, आ. मनोज घोरपडे, सातारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भोसले, सदस्य कामेश कांबळे, माजी सभापती किरण साबळे- पाटील, पंचायत समितीचे सदस्य राहुल शिंदे, रामभाऊ जगदाळे, विजय घोरपडे, विश्वास शेडगे यांच्यासह विविध गावचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ तसेच जिल्हाधिकारी संतोष पाटील, प्रांताधिकारी आशिष बारकूल यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, एनएचआय, महसूल, पोलीस प्रशासन आदी विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

बैठकीत सातारा ते लोणंद रस्ता तसेच या रस्त्यावरील वाढे फाटा, आरळे- वडूथ पूल, शिरवळ ते लोणंद रस्ता, सातारा ते कराड महामार्गावरील सेवा रस्ते दुरुस्ती, खड्डे मुजवणे, सेवा रस्त्यांवर येणारे सांडपाणी, वाढे फाटा ते आरफळ बायपास आदी मुद्यांवर चर्चा झाली. शिरवळ ते लोणंद रस्ता भूसंपादन व विविध कागदपत्रे बांधकाम विभागाने उपलब्ध करून देण्याच्या सूचना ना. शिवेंद्रसिंहराजेंनी केल्या. आरफळ फाटा ते शिवथर येथे शाळेला विध्यार्थी ये- जा करत असतात त्यामुळे या ठिकाणी पदपाथ करून विध्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची काजळी घेण्याची सूचना त्यांनी केली. सातारा ते लोणंद मार्गावर आवश्यक त्या ठिकाणी बस स्टॉप तसेच या रस्त्यासह सातारा कोल्हापूर महामार्गावर आवश्यक ठिकाणी दिशादर्शक फलक व गावांची नावे असलेले फलक तातडीने बसवावेत, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. 

सातारा कोरेगाव रस्ता खूपच ओबडधोबड झाला असून त्यावर नवीन लेअर मारा अशी सूचना ना. शिवेंद्रसिंहराजेंनी केली. कोरेगाव रस्त्यावर माहुली येथील पूल तसेच वसना नदीवरील पुलाचे काम कित्येक दिवसांपासून प्रलंबित आहे. या कामाबाबत नुसतीच चर्चा होत असते. संबंधित ठेकेदाराला काम करायचे नसेल तर त्याला काढून या कामाचे रिटेंडरिंग करा. उगाच लोकांना अर्धवट उभे केलेले  पिलर दाखवून काम सुरु असल्याचे दाखवणे बंद करा, अशा सक्त सूचना ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बैठकीत केल्या.  

Post a Comment

0 Comments