मद्यपान करणाऱ्यांकडून स्टीलचे ग्रील उखडले;
ग्रॅनाइटचेही नुकसान, नागरिकांमध्ये संताप
मेढा येथील कचेरी ग्राउंडवरील झेंडावंदन चौथऱ्याची तोडफोड झाल्याचा प्रकार समोर आला असून, या ठिकाणी रात्रीच्या वेळी मद्यपान करणाऱ्या व्यक्तींकडून सरकारी मालमत्तेचे नुकसान होत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. चौथऱ्यावरील स्टीलचे ग्रील उखडण्यात आले असून, ग्रॅनाइटचीही तोडफोड झाल्याचे दिसून येत आहे.
कचेरी ग्राउंड परिसरात रात्रीच्या वेळी मद्यपान करण्यासाठी काही जण बसत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मद्यपानानंतर रिकाम्या दारूच्या बाटल्या तसेच मोठ्या प्रमाणात कचरा परिसरात टाकला जात असल्याने सार्वजनिक ठिकाणाच्या स्वच्छतेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
राष्ट्रीय सणांच्या वेळी ज्या ठिकाणी शासकीय पद्धतीने झेंडावंदन केले जाते, त्या चौथऱ्याची झालेली तोडफोड आणि परिसराची झालेली अस्वच्छता यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांची चौकशी करून दोषींवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, कचेरी ग्राउंड परिसरात रात्रीच्या वेळी मद्यपान व गैरप्रकार होऊ नयेत यासाठी प्रशासनाने नियमित पाहणी करावी, तसेच झेंडावंदन चौथऱ्याच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही पुढे आली आहे.
0 Comments