Hot Posts

6/recent/ticker-posts

सातारा नगरवाचनालयाची वर्षभरातच पुन्हा निवडणूक

 


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

सातारा: सातारच्या श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) नगरवाचनालयाच्या विश्वस्त मंडळ आणि कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने संस्थेच्या निवडणूक प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. ऑक्टोबर २०२५ मध्ये मागची त्रैवार्षिक निवडणूक  झाली असताना   आता २०२६-२०२९ या कालावधीसाठी पुन्हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याने ही निवडणूक वर्षभरातच का घेतली जात आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

१५ नोव्हेंबरला मतदान; त्याच दिवशी निकाल

जाहीर कार्यक्रमानुसार प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, २४ ऑक्टोबरपर्यंत आक्षेप सादर करण्याची मुदत आहे. २८ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर ५ ते ७ नोव्हेंबरदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. ८ नोव्हेंबरला अर्जांची छाननी, ९ नोव्हेंबरला माघार आणि १० नोव्हेंबरला पात्र उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे.

१५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार असून, सायंकाळी ५ नंतर मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. अ‍ॅड. नितीन शिंगटे निवडणूक निर्णय अधिकारी, तर मारुती ए. पाटील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

निवडणूक वर्षभरातच का?

२०२५ मधील निवडणुकीनंतर पुन्हा निवडणूक घेण्यामागील अधिकृत कारण काय, मागील मंडळाचा कार्यकाळ किती होता आणि २०२६-२०२९ हा कालावधी कोणत्या नियमांच्या आधारे निश्चित करण्यात आला, हे स्पष्ट होणे महत्त्वाचे आहे. याबाबत संस्थेचे अधिकृत स्पष्टीकरण समोर आल्यास निर्माण झालेले प्रश्न दूर होण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया काही सभासदांनी व्यक्त केली आहे. 

नगरवाचनालय ही साताऱ्याची महत्त्वाची वाचनसंस्था असल्याने तिच्या कारभारात पारदर्शकता आणि निवडणूक प्रक्रियेवरील सभासदांचा विश्वास टिकवणे आवश्यक आहे. त्यामुळे निवडणूक कार्यक्रमामागील कारणे स्पष्ट करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

दरम्यान, यासंदर्भात माहितीसाठी संपर्क केला असता ॲड. नितीन शिंगटे यांनी फोन उचलला नाही  

धर्मादाय आयुक्तांच्या आदेशानुसार निवडणूक

अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी सहाय्यक धर्मादाय आयुक्तांच्या आदेशानुसार ही निवडणूक प्रक्रिया पार पाडली जात असल्याचे सांगून यासंबंधी अधिक भाष्य करण्यास नकार दिला. 

Post a Comment

0 Comments