Hot Posts

6/recent/ticker-posts

वडूथ–सातारा मार्गावरील वाहतुकीत बदल


सत्य सह्याद्री/सातारा

वडूथ–सातारा–अंबवडे (सं)–किंजळे या प्रमुख जिल्हा मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेल्या बांधकामामुळे वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतूक १ नोव्हेंबर पासून ३१ जानेवारी २०२७ पर्यंत पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी दिले आहेत.

 पुलाचे काम पूर्ण होण्यासाठी सुमारे तीन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने नागरिकांची तसेच वाहनचालकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पर्यायी वाहतूक मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.


वडूथवरून सातारा रोड व किंजळईकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक वडूथ–भिमनगर फाटा–पाडळी–जळगाव–सातारा रोड–अंबवडे (सं) मार्गे किंजळईकडे जाईल. किंजळई व सातारा रोडवरून वडूथकडे जाणारी वाहने किंजळई–सातारा रोड–जळगाव–पाडळी–भिमनगर फाटा मार्गे वडूथकडे वळविण्यात आली आहेत.

तसेच वडूथवरून कोरेगावकडे जाणारी वाहतूक वडूथ–भिमनगर फाटा–पाडळी–जळगाव मार्गे कोरेगावकडे जाईल. कोरेगाववरून वडूथकडे येणारी वाहतूक कोरेगाव–जळगाव–पाडळी–भिमनगर फाटा मार्गे वळविण्यात आली आहे.

याशिवाय, वसना नदी येथील पुलाच्या दोन्ही बाजूंना १०० मीटरपर्यंतचा रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आला आहे. या वाहतूक बदलांच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नेमण्यात येणार असून, नागरिकांनी आणि वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा. वाहतूक पोलिसांना सहकार्य करून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.


Post a Comment

0 Comments