कराड / विशेष प्रतिनिधी
यावर्षी अत्यंत कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पूर्णतः वाया गेला आहे. त्यामुळे राज्य सरकारने राज्यातील 308 तालुक्यात दुष्काळ जाहीर करुन करावयाच्या कामाचे धोरण जाहीर केले. यामध्ये प्रामुख्याने दुष्काळग्रस्त तालुक्यातील शालेय विध्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाला काही दिवस उलटतात तोपर्यंत राज्यातील अनेक शिक्षण संस्थानी विध्यार्थ्याकडून रोख स्वरूपात परीक्षा फी भरून घेतल्याने सरकारची घोषणा फसवी होती की शिक्षण संस्थानी सरकारच्या घोषणेला जुमानले नाही? याचे कोडे अजूनही न उलगडल्याने पालक वर्गातून संताप व्यक्त होत आहे.
यावर्षी राज्यातील मराठवाडा, विदर्भासह कृष्णा, कोयना, वारणा, मोरणा, पंचगंगा आदी नदीकाठाकडेला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील अनेक तालुके दुष्काळग्रस्त म्हणून सरकारने जाहीर केले आहेत. या सर्व दुष्काळी भागात तातडीने 12 योजना राबवण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयामध्ये प्रामुख्याने दुष्काळी तालुके आणि गावातील शालेय विध्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे विशेषता विद्यार्थीवर्गात समाधानाचे वातावरण होते. त्याला कारणही तसेच होते. याच दरम्यान 10 आणि 12 वी बोर्ड परीक्षेचे फॉर्म भरण्याचे काम सुरु होते. नेमका हाच धागा पकडून सरकारने परीक्षा फी माफ करण्याची घोषणा केल्याने पालकवर्गाने या घोषणेचे जोरदार स्वागत केले होते. परंतु गेल्या 15 दिवसापासून माध्यमिक, उच्च माध्यमिक, उच्च व तंत्र शिक्षण, अभियांत्रिकी महाविद्यालये यासह विविध शिक्षण संस्थानी सरकारने जरी घोषणा केली असली तरी 'आता तुम्ही परीक्षेची संपूर्ण फी भरा 'सरकारकडून अनुदान मिळताच तुमची भरलेली रक्कम परत केली जाईल, असे सांगून विध्यार्थ्याकडून परीक्षेची फी वसुल करण्याचे काम सध्या सुरु आहे. शाळा, महाविद्यालये आणि विविध उच्च व तंत्र शिक्षण संस्थामध्ये शिक्षण घ्यायचे असल्याने विद्यार्थी अथवा पालक त्यांना विरोध न करता गुपचूप फिची रक्कम भरत आहेत. विरोध करणाऱ्या विध्यार्थ्याला दमदाटी केल्याच्या घटना आहेत. मग सांगा पालक अथवा विध्यार्थ्याने दाद तरी मागायची कुणाकडे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबत राज्याच्या शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण मंत्रिमंहोदयांनी या बाबीची तातडीने चौकशी करुन विध्यार्थ्याकडून वसुल केलेली फी ची रक्कम त्वरित विध्यार्थ्यांना परत करावी अन्यथा पालक वर्गाला आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल असा इशारा देण्यात आला आहे.
शासकीय कॉलेजनेही भरून घेतली फी...
यावर्षी शाळा, महाविद्यालये, डिप्लोमा आणि अभियांत्रिकी महाविद्यालयानी जुलै, ऑगस्ट महिन्यात पुढील वर्षाचे प्रवेश घेत असताना विध्यार्थ्यांकडून आगाऊ परीक्षा फी भरून घेतली आहे. त्यानंतर सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. अशा महाविद्यालयातील विध्यार्थ्यांना सरकारची घोषणा लागू होणार काय? येथे शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांची रक्कम परत केली जाणार काय? याचा खुलासा होणे गरजेचे आहे.
...
.. अन शिक्षण संस्थानी फी घेतलीच!
दोन वर्षांपूर्वी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मुलींना उच्च व तंत्र शिक्षण मोफत करण्याची घोषणा केली. त्यांची घोषणा हुशार, गरीब आणि गरजू मुलींना उच्च शिक्षण सहज घेता यावे हा मूळ उद्देश होता. मात्र राज्यातील अनेक आमदार, खासदार आणि मंत्री असणाऱ्या नेत्यांच्या शिक्षण संस्थानी सरकारच्या घोषनेचा अध्यादेश येण्यापूर्वी मुलीकडून शिक्षण फी वसुल केली होती. ती कोणत्याही शिक्षण संस्थानी आज अखेर परत केली नाही. त्यामुळे सरकारच्या घोषणा म्हणजे लुटालूट तरी नाही ना? असा प्रश्न निर्माण होत आहे.
0 Comments