सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा: भारतीय वायुसेनेच्या सूर्यकिरण एरोबॅटिक टीमच्या चित्तथरारक हवाई कसरतींनी सोमवारी (दि. २३) साताऱ्याच्या आकाशात वेगळाच थरार निर्माण केला. गुरुवारी (दि. २६) होणाऱ्या भव्य एअर शो आणि 'एअर वॉरियर ड्रिल'च्या सादरीकरणापूर्वी वायुसेनेच्या विमानांनी आकाशात रंगीत तालीम घेतली. या प्रात्यक्षिकांमुळे साताऱ्याच्या आकाशाकडे नागरिकांचे लक्ष वेधले गेले असून, आगामी एअर शोबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
भारतीय वायुसेनेच्या शौर्य, सामर्थ्य आणि अत्याधुनिक हवाई कौशल्याचे दर्शन घडविणारी सूर्यकिरण टीम साताऱ्यात दाखल झाली आहे. या टीमकडून सादर केल्या जाणाऱ्या हवाई प्रात्यक्षिकांची पूर्वतयारी म्हणून विमानांनी आकाशात विविध चाचण्या आणि सराव केला. वेगवान हालचाली, शिस्तबद्ध संचलन आणि आकाशात साकारल्या जाणाऱ्या विविध हवाई कसरतींची झलक पाहण्याची संधी नागरिकांना मिळाली.
गुरुवारी होणाऱ्या मुख्य एअर शोमध्ये सूर्यकिरण टीमकडून अधिकृत सादरीकरण केले जाणार आहे. यासोबतच 'एअर वॉरियर ड्रिल'च्या माध्यमातून भारतीय वायुसेनेच्या जवानांचे कौशल्य, शिस्त आणि सज्जतेचे दर्शन घडणार आहे. त्यामुळे हा कार्यक्रम केवळ मनोरंजनाची पर्वणी न ठरता देशाच्या हवाई संरक्षण सामर्थ्याचा अभिमानास्पद अनुभव ठरणार आहे.
दरम्यान, रंगीत तालमीदरम्यान आकाशात झेपावणाऱ्या विमानांचा आवाज आणि त्यांच्या चित्तथरारक हालचालींमुळे शहरासह परिसरातील नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झाले. अनेकांनी आकाशाकडे नजर लावत या प्रात्यक्षिकांचा आनंद घेतला. गुरुवारच्या मुख्य कार्यक्रमात सूर्यकिरण टीम कोणत्या अद्भुत हवाई कसरती सादर करणार, याचीच आता साताऱ्यात उत्सुकता आहे.

0 Comments