वाई (प्रतिनिधी): आईचे वर्षश्राद्ध आटोपून मुंबईहून चिपळूणकडे परतणाऱ्या कुटुंबाच्या प्रवासावर काळाने घाला घातला. सातारा-पुणे महामार्गावरील सुरूर येथील भारत पेट्रोल पंपाजवळील आई हॉटेलसमोर शनिवारी सकाळी आठच्या सुमारास अल्टो कारचा भीषण अपघात झाला. चालकाला डुलकी लागल्याने कारवरील नियंत्रण सुटून कार सर्व्हिस रोडवरील दुभाजकाला धडकली आणि तब्बल तीन वेळा पलटी झाली. या भीषण अपघातात वैष्णवी वैभव कदम (वय ४३) आणि विजय धोंडू पवार (वय ७०, दोघेही रा. चिपळूण) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अन्य तिघे जखमी झाले.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूण येथील कुटुंबीय आईचे वर्षश्राद्ध करून मुंबईहून चिपळूणकडे निघाले होते. MH 14 BK 7933 क्रमांकाची अल्टो कार वैभव वामन कदम (वय ४५) चालवत होते. सुरूर येथील भारत पेट्रोल पंपाजवळ आल्यानंतर चालकाला डुलकी लागल्याने कारवरील नियंत्रण सुटले. कार थेट सर्व्हिस रोडवरील दुभाजकाला धडकली. धडकेनंतर कार तीन वेळा पलटी झाल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले. अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
या अपघातात वैष्णवी वैभव कदम आणि विजय धोंडू पवार यांचा मृत्यू झाला. तर वैभव वामन कदम (वय ४५), वैशाली विजय पवार (वय ६२) आणि वेदांत वैभव कदम (वय १३) हे तिघे जखमी झाले आहेत. जखमींना पुढील उपचारासाठी सातारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच जोशी विहीर महामार्ग पोलीस अधिकारी आशीष कवठेकर यांनी किशोर नलावडे, मिथुन मोरे, हेमंत ननवरे, संतोष कचरे आणि अक्षय शिंदे यांच्यासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्तांना मदत करण्याबरोबरच महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले.
या घटनेमुळे कदम-पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे करीत आहेत.
0 Comments