Hot Posts

6/recent/ticker-posts

जयाभाऊ जिल्हा बँकेची चौकशी लावाच!

 

संदीप कुलकर्णी

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा धुरळा खाली बसल्यानंतर आता बँकेच्या कारभारावरून नवे राजकीय वादळ उठण्याची चिन्हे दिसत आहेत. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी बँकेतील गफले तसेच सॉफ्टवेअर आणि लॅपटॉप खरेदीच्या सुमारे १०० कोटी रुपयांच्या व्यवहारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या खरेदीतील कथित गैरव्यवहार जनतेसमोर आणण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. हा आरोप केवळ राजकीय वक्तव्य म्हणून बाजूला सारता येणार नाही. आधीच गेल्या अनेक वर्षांपासून भरतीतीतील घोटाळ्याच्या मुद्द्यावरून कधी उघड, कधी छुपे अनेक आरोप प्रत्यारोप होत राहिले. पण, त्यातील सत्य आजपर्यंत बाहेर आले नाही. आता जयकुमार गोरेंसारख्या जबाबदार मंत्र्याने केलेल्या आरोपांना निश्चितच महत्त्व आहे.  कारण प्रश्न एका सहकारी बँकेच्या आर्थिक व्यवहारांचा आणि सभासदांच्या पैशांच्या विनियोगाचा आहे.  जिल्हा बँक ही एखाद्या राजकीय पक्षाची किंवा नेत्याची खासगी मालमत्ता नाही. जिल्ह्यातील शेतकरी, सहकारी संस्था आणि सभासदांच्या विश्वासावर उभी असलेली ही आर्थिक संस्था आहे. शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यापासून ते ग्रामीण भागातील आर्थिक व्यवहारांना चालना देण्यापर्यंत बँकेची भूमिका महत्त्वाची आहे. अशा संस्थेत कोट्यवधी रुपयांची खरेदी झाली असेल, तर तिच्या प्रत्येक टप्प्याचा हिशेब पारदर्शक असणे अपेक्षित आहे. मंत्री गोरे यांनी उपस्थित केलेला मुद्दा नेमका काय आहे? सॉफ्टवेअर खरेदी किती किमतीत झाली? लॅपटॉप किती खरेदी केले? त्यांची संख्या, दर्जा आणि प्रत्यक्ष वितरण यांचा तपशील काय? खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती का? स्पर्धात्मक दर मागवले होते का? खरेदीला संचालक मंडळाची मंजुरी होती का? बाजारभाव आणि प्रत्यक्ष खरेदीदर यांत काही तफावत होती का? हे प्रश्न आता बँकेने स्पष्टपणे उत्तरले पाहिजेत. १०० कोटी रुपयांचा उल्लेख होत असताना हा आकडा नेमका कोणत्या कालावधीतील आणि कोणकोणत्या खरेदी व्यवहारांचा आहे, हेही स्पष्ट होणे आवश्यक आहे. सॉफ्टवेअर, संगणकीय यंत्रणा, लॅपटॉप, देखभाल आणि तांत्रिक सेवा यांचा समावेश या रकमेत आहे का, याची माहिती जनतेसमोर आली पाहिजे. केवळ मोठा आकडा सांगून संशय निर्माण करणे किंवा आरोप करणाऱ्यांना राजकीय हेतूने प्रेरित ठरवणे, या दोन्ही गोष्टींनी सत्य बाहेर येणार नाही. सहकारी बँकांच्या खरेदी प्रक्रियेला नियम आणि लेखापरीक्षणाची चौकट आहे. निविदा प्रक्रिया, दरांची तुलना, खरेदी आदेश, पुरवठादारांची पात्रता, वस्तूंची प्रत्यक्ष उपलब्धता आणि वापर यांची कागदोपत्री नोंद असणे अपेक्षित आहे. त्यामुळे या व्यवहारांची स्वतंत्र आणि निष्पक्ष तपासणी झाली, तर आरोपांमागील तथ्य स्पष्ट होऊ शकते. अनियमितता आढळल्यास जबाबदार व्यक्तींवर नियमानुसार कारवाई झाली पाहिजे. व्यवहार योग्य असल्याचे निष्पन्न झाल्यास बँकेची आणि संबंधितांची प्रतिमा विनाकारण मलिन होऊ नये, याचीही काळजी घेतली पाहिजे. विशेष म्हणजे, जिल्हा बँकेच्या अलीकडील निवडणुकीनंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीवरून महायुतीतील नेत्यांमध्ये मतभेद उघड झाले. त्यानंतर बँकेच्या कारभारावरून आरोप होऊ लागले आहेत. राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हे आरोप पुढे आले असले, तरी त्यामुळे मूळ प्रश्नाचे महत्त्व कमी होत नाही. आरोप करणारे सत्तेतील असोत किंवा विरोधातील, त्यांनी पुरावे द्यावेत. बँकेच्या विद्यमान संचालक मंडळानेही केवळ राजकीय प्रतिक्रिया न देता व्यवहारांची माहिती सार्वजनिक करावी.या प्रकरणात एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मंत्री गोरे यांनी गैरव्यवहार बाहेर काढण्याचा इशारा दिला आहे; मात्र अधिकृत चौकशीचे आदेश निघाले आहेत का, याची स्पष्टता अद्याप नाही. त्यामुळे केवळ पत्रकार परिषदेत दिलेला इशारा पुरेसा ठरणार नाही. चौकशी करायची असेल तर सक्षम यंत्रणेमार्फत लेखी आदेश, तपासाची व्याप्ती, संबंधित व्यवहारांचा कालावधी आणि अहवाल सादर करण्याची मुदत निश्चित झाली पाहिजे. चौकशी राजकीय सोयीने सुरू किंवा बंद होणार नाही, याची खात्रीही आवश्यक आहे. जर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर भाजपचा कार्यकर्ता बसला असता तर जयकुमार गोरे यांनी असे आरोप केले असते का हाही एक विचार करण्यासाखा प्रश्न आहे. एकीकडे महायुतीचा अध्यक्ष झाला म्हणायचे आणि दुसरीकडे मनासारखे न घडल्याने घोटाळा बाहेर काढू म्हणायचे हेही गोरे यांना शोभत नाही.  बँकेच्या सभासदांना आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या व्यवहारांचा तपशील जाणून घेण्याचा अधिकार आहे. खरेदीत अनियमितता झाली नसेल, तर ती कागदपत्रांसह स्पष्ट करण्याची जबाबदारी बँकेची आहे. गैरव्यवहार झाला असेल, तर त्याची जबाबदारी निश्चित करून दोषींवर कारवाई करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. जिल्हा बँकेच्या सत्तेवर कोण बसले, यापेक्षा बँकेचा पैसा कसा वापरला जातो, हे अधिक महत्त्वाचे आहे. निवडणुकीत विजय मिळवणे म्हणजे कारभाराला जनतेची बिनशर्त मान्यता मिळणे नव्हे. १०० कोटींच्या खरेदी व्यवहारांबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांची उत्तरे आता भाषणांतून नव्हे, तर कागदपत्रांतून मिळाली पाहिजेत. चौकशीची घोषणा होऊन ती फाईलमध्ये बंद राहिली, तर संशय अधिक गडद होईल. जिल्हा बँकेच्या कारभारातील पारदर्शकता सिद्ध करण्याची हीच खरी वेळ आहे, देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे असल्याने गोरे त्यांच्या मनात येईल ते करु शकतात, अशी अनेक  उदाहरणे घडल्याचे जिल्ह्याने पाहिले आहे.  त्यामुळे जयाभाऊ खरोखरच बँकेची चौकशी लावाच, होऊन जाऊद्या दूध का दूध अन पानी का पानी!

Post a Comment

0 Comments