Hot Posts

6/recent/ticker-posts

हुंडा व पैशासाठी छळ; विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या, रुईघर ता जावळी येथील घटना

पांचगणी, ता. 25 : हुंडा, म्हाडाच्या घरासाठी पैसे आणि दागिन्यांच्या मागणीवरून होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून तरुणीने घरासमोरील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जावली तालुक्यातील रुईघर येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी पती व सासूविरोधात मेढा पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्यासह विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काजल सागर धनावडे (वय २८, मूळ रा. मांढरेवाडी, ता. वाई; सद्य रा. कोपरखैरणे, नवी मुंबई) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तिचा विवाह २७ जून २०२६ रोजी सागर चंद्रकांत धनावडे (वय ३३) याच्याशी झाला होता. विवाहानंतर पती सागर व सासू उषा चंद्रकांत धनावडे यांनी म्हाडाचे घर घेण्यासाठी माहेरहून एक लाख रुपये आणावेत, तसेच लग्नात एक तोळे सोने दिले असून चार तोळ्यांचे मंगळसूत्र आणावे, अशी मागणी करत तिचा छळ सुरू केला. तिला वेळेवर जेवण न देणे, घरात कोंडून ठेवणे, मारहाण करणे आणि दागिने काढून घेणे असे प्रकार सुरू असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. आई सुजाता अशोक बेलोशे यांनी समजूत घालून ७० हजार रुपये देऊन १२ नोव्हेंबर रोजी तिला सासरी पाठवले होते. मात्र, छळ सुरूच राहिल्याने काजल २३ नोव्हेंबर रोजी पहाटे रुईघर येथील माहेरी परतली. रात्री पतीशी फोनवर बोलणे झाले असता त्याने तिकडेच राहण्यास सांगून शिवीगाळ केल्याचे तिने आईला सांगितले.

दुसऱ्या दिवशी २४ नोव्हेंबर रोजी दुपारी आई आजारी भावाला भेटण्यासाठी राजपुरी येथे गेल्या असताना काजलने रुईघर येथील घरासमोरील विहिरीत उडी घेऊन जीवन संपवले. या प्रकरणी आई सुजाता बेलोशे यांच्या फिर्यादीवरून पती सागर धनावडे व सासू उषा धनावडे यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम १०८, ८०, ८५, ३५१(४), ११५(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक विजय रामचंद्र शिंगटे अधिक तपास करत आहेत.
सोबत फोटो आहे 
मृत काजल धनावडे

Post a Comment

0 Comments